तेलंगणातील RIMS रुग्णालयातील व्हेंटिलेटर चोरीचा चंद्रपूर पोलिसांकडून पर्दाफाश!

तेलंगणातील RIMS रुग्णालयातील व्हेंटिलेटर चोरीचा चंद्रपूर पोलिसांकडून पर्दाफाश!

₹२० लाखांच्या चार व्हेंटिलेटर चोरीप्रकरणी मुख्य संशयित चंद्रपुरातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपी तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन

चंद्रपूर, दि. ४ नोव्हेंबर : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था (RIMS) या शासकीय रुग्णालयातून चोरीस गेलेल्या चार महागड्या व्हेंटिलेटर चोरीप्रकरणाचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी त्याला तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आदिलाबाद येथील RIMS शासकीय रुग्णालयातील RICU, SARI तसेच TB वॉर्डमधून चार महागडे व्हेंटिलेटर अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते. या चोरीच्या साहित्याची एकूण अंदाजित किंमत २० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी आदिलाबाद-२ टाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तेलंगणा पोलिसांकडून तपास सुरू असताना, चंद्रपूर पोलिसांनीही प्राप्त CCTV फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या चोरीतील संशयित व्यक्ती चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून सज्जन वसंत मोटे (वय ४५ वर्षे, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयिताची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस वार्तापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आवश्यक कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून आरोपीला पुढील तपास आणि चोरीच्या मुद्देमालाच्या जप्ती प्रक्रियेसाठी तेलंगणा पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस हवालदार सतीश अवथरे, इमरान खान, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, लालु यादव तसेच पोलीस अंमलदार शशांक बादामवार आणि किशोर वाकाटे यांनी सहभाग घेतला.

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीमुळे तेलंगणा राज्यातील रुग्णालयातील महागड्या वैद्यकीय उपकरणांच्या चोरीप्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.



Comments