चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे १९ सप्टेंबरपासून ‘भव्य सहकार सप्ताह’
सहकार महर्षी कै. अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन; वैशालीताई वासाडे यांचा सन्मान व कर्ज वितरण सोहळा
चंद्रपूर : सहकार क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे सहकार महर्षी कै. अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘भव्य सहकार सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भव्य सहकार सप्ताहाचा मुख्य उद्घाटन कार्यक्रम दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता मा.सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सहकार महर्षी कै. अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या अर्धांगिनी श्रीमती वैशालीताई वासाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, जि.प. चंद्रपूर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच कै. अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्यासोबत सहकार चळवळीत कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून, यावेळी कर्ज वितरण सोहळाही पार पडणार आहे.
दि. १९ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत बँकेच्या शाखा व विभागीय स्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून सहकार सप्ताह मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका श्रीमती प्रतिभाताई सुरेश धानोरकर राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमारजी भांगडीया यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराजजी अहिर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. तसेच बल्लारपूर, पोंभुर्णाचे आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोराचे आमदार करण देवतळे, राजुराचे आमदार देवराव भोंगळे, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे तसेच प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांतभाऊ वासाडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव अवेश खान पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर भि. कल्याणकर तसेच बँकेचे समस्त संचालक मंडळ यांच्या पुढाकाराने या सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सहकार महर्षी कै. अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच सहकार चळवळीला अधिक व्यापक आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहकार सप्ताहास सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment