लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी आणि चिखलाचे स्वरूप आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नालेसफाई करावी तसेच सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात प्रशासनाने दोन दिवसांत ठोस उपाययोजना करून समस्या मार्गी न लावल्यास सुमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभागप्रमुख सचिन दडमल यांनी दिला आहे. याबाबत पंचायत समितीकडे तक्रारही करण्यात आली आहे. आता पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


Comments