गणेश विसर्जनापूर्वी विद्युत लाईनचे काम पूर्ण करा; ठेकेदारावर कारवाई करा
छोटूभाई शेख यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन; काम वेळेत न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वरोरा, दि. १० सप्टेंबर : वरोरा शहरातील मुख्य बाजारपेठ, मित्र चौक, डोंगरवार चौक, पद्मावार चौक आणि गणेश विसर्जन स्थळ परिसरातील जुन्या व कमी उंचीच्या विद्युत पोल आणि तारांमुळे सार्वजनिक उत्सव, मिरवणुका व विसर्जन सोहळ्यादरम्यान गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश विसर्जनापूर्वी विद्युत लाईनचे काम तातडीने पूर्ण करून कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी माजी सभापती तथा जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुद्दीन छोटूभाई यांनी केली आहे.
यासंदर्भात छोटूभाई शेख यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करून निवेदन सादर केले. महावितरणकडून डीपीडीसी योजनेअंतर्गत ११ लाख ५० हजार रुपयांच्या निधीतून या परिसरातील विद्युत व्यवस्था सुधारण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये ११ मीटर उंचीचे ४४ विद्युत पोल तसेच सुमारे १००० मीटर कंडक्टर तार व केबल टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. या कामाची वर्क ऑर्डर सुमारे सात महिन्यांपूर्वी ठेकेदाराला देण्यात आली असतानाही अद्याप काम सुरू झाले नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
मुख्य बाजारपेठेतून गणेश व दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुका तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. या वेळी कमी उंचीच्या विद्युत तारांमुळे मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे विद्युत अपघाताची शक्यता असून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी संबंधित अधिकाऱ्यांसह बाजारपेठ परिसराची पाहणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच निवेदनकर्त्यांनाही पाहणीवेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.
१५ वर्षांपूर्वीच्या पाठपुराव्याची आठवण
वरोरा मुख्य बाजारपेठेतील विद्युत सुरक्षेचा प्रश्न यापूर्वीही गंभीर राहिला आहे. सुमारे ७० वर्षांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान दुकानाच्या वर बसलेल्या दोन व्यक्तींना विद्युत अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर गणेश विसर्जनाच्या वेळी मुख्य बाजारपेठ परिसरातील विद्युत लाईन तब्बल ४५ वर्षे बंद ठेवली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सुमारे १५ वर्षांपूर्वी छोटूभाई शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून या परिसरातील विद्युत पोलची उंची वाढविणे व केबल टाकण्याचे काम मंजूर करून पूर्ण करून घेतले होते. आंबेडकर चौक ते डोंगरवार चौक आणि वीर सावरकर चौकापर्यंतच्या विद्युत लाईनची समस्या दूर झाल्याने मागील १५ वर्षांपासून गणेश विसर्जनादरम्यान या परिसरातील विद्युत पुरवठा सुरू ठेवणे शक्य होत आहे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी शेख जैरुद्दीन छोटूभाई, वसंतराव विधाते, मोहसीन पठाण, रूपेश लांडे, गुलाब धोबे, अनीस शेख, नासीर शेख, दीपक बांगडे, ईसराइल शेख, प्रशांत पिपरे, फजल शेख, आकाश लोखंडे, वैभव खंडाळकर, श्री. खारकर यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
निवेदनाची प्रत आमदार करणजी देवतळे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी तसेच पोलीस ठाणेदार यांना देण्यात आली. दि. १५ रोजी काम सुरू करून गणेश विसर्जनापूर्वी ते पूर्ण न केल्यास तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छोटूभाई शेख यांनी दिला.
Comments
Post a Comment