वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.


वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात

वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026

वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला.

यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे महेश शांताराम येलमुले (३३), कुंदन संजय मिलमिले (२३), मधुकर नागोजी मोडक (३१), बंडु शामराव आवारी (६०), रवि भाऊराव खोंडे (५०), संजय जयराम पिंपळशेंडे (५५), चंद्रशेखर वारलु मोडक (४५) आणि दिलीप जयराम काळे (४७) अशी आहेत.

या कारवाईत आरोपींच्या अंगझडतीत एकूण १३,५०० रुपये, जुगाराच्या डावावर ४,७०० रुपये रोख आणि ५२ तास पत्त्यांचा एक संच, किंमत ५० रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळ पंचनामा १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४० ते ६.२० वाजेपर्यंत करण्यात आला.

या प्रकरणात कोणाजवळ एकही मोबाईल नव्हता आणि वाहन पण नव्हते हे विशेष. 

या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments