वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव; १० सप्टेंबरला विशेष सभा
पोळ्याच्या दिवशी होणार मतदान; डॉ. विजय देवतळे यांचे सभापतीपद धोक्यात?
वरोरा : कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा येथील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विद्यमान सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावावर चर्चा व मतदान करण्यासाठी १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयाने यासंदर्भात विशेष सभेची नोटीस जारी केली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम २३क (३) अंतर्गत ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीच्या कार्यकारी संचालक मंडळातील सदस्य राजेंद्र नथ्थुजी चिकटे यांच्यासह १२ सदस्यांनी सभापती डॉ. विजय देवतळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस सादर केली आहे. बाजार समितीतील एकूण १७ कार्यरत सदस्यांपैकी १२ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये18 सदस्य होते त्यापैकी एक सदस्य अपात्र आहे. बाजार समितीमध्ये 17 ची संचालक मंडळ कार्यरत आहे. 17 पैकी 12 सदस्यांची अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी आवश्यकता असते.
या पहिले सुद्धा अविश्वासाचा प्रयत्न करण्यात आला होता. एक सदस्य अपात्र झाल्यामुळे हा अविश्वास ठराव पारित झाला नव्हता.
अविश्वास प्रस्तावामागील प्रमुख आरोप
सभापती डॉ. विजय देवतळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावात पुढील मुद्दे नमूद करण्यात आले आहेत—
- संचालकांना विश्वासात न घेता कामकाज करणे.
- बाजार समितीच्या नियमानुसार दैनंदिन कामकाज न चालविणे.
- सभापतींच्या कार्यकाळात झालेल्या नियमबाह्य कामांची कायद्यानुसार चौकशी व कार्यवाही न करणे.
- जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ४० (ई) अन्वये दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याचा मुद्दा.
ही विशेष सभा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार असून अविश्वास प्रस्तावावर चर्चा करून मतदान घेतले जाणार आहे.
पोळ्याच्या दिवशी राजकीय रंगत
विशेष म्हणजे, १० सप्टेंबर हा शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा सण पोळा आहे. एकीकडे शेतकरी आपला पारंपरिक सण उत्साहात साजरा करणार असताना, दुसरीकडे वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या भवितव्याचा फैसला मतदानातून होणार आहे.
त्यामुळे पोळ्याच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय आखाड्यात नेमका कोणाचा ‘फुगा फुटतो’ आणि कोणाचे पारडे जड ठरते, याकडे वरोरा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
....................................
Comments
Post a Comment