जतन फोटो.
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे व तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध
नियम मोडल्यास साहित्य जप्तीसह अटक व कायदेशीर कारवाई; पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश
चंद्रपूर दि ८ सप्टेंबर २०२६
आगामी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी लेझर लाईट, तीव्र फ्लॅश लाईट, डीजे तसेच अत्यंत तीव्र ध्वनिक्षेपकांच्या वापरावर विशेष निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३६ व कलम ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.
हे आदेश दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून ते दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
लेझर लाईटवर पूर्ण बंदी
मिरवणुकांदरम्यान लेझर लाईट, तीव्र क्षमतेचे फ्लॅश लाईट तसेच मानवी डोळ्यांवर व आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधिकारी अथवा सक्षम प्राधिकाऱ्यांना मिरवणुकीतील लाईट उपकरणांची तपासणी करण्याचा अधिकार राहणार असून, धोकादायक उपकरणे आढळल्यास ती तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जातील.
डीजे व मॉडिफाईड साउंड सिस्टीमवरही बंदी
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३८(१) अन्वये सक्षम प्राधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर अथवा अॅम्प्लीफायरचा वापर करता येणार नाही.
तसेच डीजे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाईड साउंड इक्विपमेंट, वुफर, सबवुफर यांसारख्या अत्यंत तीव्र व आरोग्यास हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी राहणार आहे.
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांना मनाई
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डीजे वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी विशेष सूट दिलेले दिवस व वेळ याला अपवाद राहतील.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालये यांसारख्या घोषित शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
परिसरनिहाय ध्वनी मर्यादा निश्चित
प्रशासनाने विविध क्षेत्रांसाठी डेसिबलनुसार ध्वनी मर्यादा निश्चित केल्या आहेत.
| क्षेत्र |
दिवसा ध्वनी मर्यादा |
रात्री ध्वनी मर्यादा |
| औद्योगिक क्षेत्र |
७५ डेसिबल |
७० डेसिबल |
| व्यावसायिक क्षेत्र |
६५ डेसिबल |
५५ डेसिबल |
| निवासी क्षेत्र |
५५ डेसिबल |
४५ डेसिबल |
| शांतता क्षेत्र |
५० डेसिबल |
४० डेसिबल |
नियम मोडल्यास साहित्य जप्तीसह अटक
निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ७० अन्वये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ध्वनी व प्रकाश यंत्रणा तसेच संबंधित उपकरणे जप्त केली जाऊ शकतात.
तसेच आयोजक, ऑपरेटर अथवा वाहन चालकांविरुद्ध कलम ७२(२) अन्वये वारंटशिवाय अटक करण्याची कारवाई होऊ शकते. याशिवाय कलम १३४ व १३६ अन्वये संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चंद्रपूर पोलीस प्रशासनाने सर्व नागरिक, सार्वजनिक उत्सव मंडळे व आयोजकांना नियमांचे पालन करून शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात सण-उत्सव साजरे करण्याचे तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
.......
Comments
Post a Comment