पोलीस कोठडीत असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; झटापटीत तीन पोलिसांसह आरोपी जखमी.
“तुम्ही काय पोलीस आहे, मी फसवणूक केलेली रक्कम शोधून काढा व रिकव्हर करून दाखवा,” पोलिसांना आव्हान
वरोरा | दि. ८ सप्टेंबर २०२६
वरोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडी रिमांडदरम्यान स्वतःवर टोकदार लोखंडी टोच्याने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) सायंकाळी वरोरा पोलीस ठाण्यात घडली. आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत आरोपीसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२६, १२५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरोरा पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक ८४५/२०२६ मध्ये कलम ३१८(४), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये अटक करण्यात आलेला आरोपी विनोद शामराव सोयाम (वय ४०, रा. शिवनेरी नगरी, देशपांडे पेट्रोल पंपामागे, वरोरा, जि. चंद्रपूर) हा दि. ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांडवर होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार यांच्या नेतृत्वाखालील पथक दि. ७ सप्टेंबर रोजी आरोपीसह भोपाळ (मध्य प्रदेश) येथे रवाना झाले होते. पथकात पोलीस हवालदार रूपेश मुल्लेमवार, पोहवा/२५७१ संदीप मुळे व पोअं/०१ विशाल राजुरकर यांचा समावेश होता.
प्रवासादरम्यान बैतूलजवळ आरोपीकडे फसवणुकीच्या रकमेसंदर्भात पुन्हा विचारणा करण्यात आली. मात्र, आरोपीने समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो केवळ पोलीस कोठडीचा कालावधी पूर्ण करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने भोपाळ येथे रक्कम ठेवल्याचे खोटे सांगत असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर वरिष्ठांना माहिती देऊन तपास पथक आरोपीसह वरोऱ्याकडे परतले.
सायंकाळी सुमारे ५ वाजता पथक वरोरा पोलीस ठाण्यात परतले. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात गणेश मंडळांची बैठक सुरू असल्याने तपास अधिकारी पोउपनि मनीष तालेवार यांनी आरोपीसह तपास पथकाला तपास पथकाच्या खोलीत जाण्याचे आदेश दिले.
तेथे आरोपीकडे फसवणुकीच्या रकमेसंदर्भात चौकशी सुरू असताना आरोपीने, “तुम्ही काय पोलीस आहे, मी फसवणूक केलेली रक्कम शोधून काढा व रिकव्हर करून दाखवा,” असे आव्हानात्मक शब्द उच्चारल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे.
यानंतर आरोपीने अचानक टेबलावर ठेवलेला लाकडी मुठीचा लोखंडी सळाखीचा टोकदार टोचा हातात घेत स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोउपनि मनीष तालेवार व आरोपीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ आरोपीला पकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
या झटापटीत आरोपीच्या पोटावर व मानेवर खरचटल्याच्या जखमा झाल्या. तसेच पोउपनि मनीष तालेवार यांच्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळ, पोहवा संदीप मुळे यांच्या उजव्या हाताच्या पंजावर आणि पोअं विशाल राजुरकर यांच्या डाव्या हाताच्या पंजावर खरचटल्याच्या जखमा झाल्या.
पोलिसांनी आरोपीच्या हातातील टोकदार टोचा हिसकावून सुरक्षित ठेवला. घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून आरोपी व जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे नेण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात आणून सुरक्षित हवालात बंद करण्यात आले.
फिर्यादीनुसार, आरोपीने गुन्ह्याच्या तपासात अडथळा निर्माण करण्याच्या तसेच फसवणुकीची रक्कम पोलिसांच्या हाती लागू नये या उद्देशाने स्वतःला इजा करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला वाचविताना पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२६ व १२५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
..............................
Comments
Post a Comment