लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

येन्सा गावातील शासकीय पाणीपुरवठ्यात पक्ष्याचे पिसे; दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांमध्ये संताप.

येन्सा गावातील शासकीय पाणीपुरवठ्यात पक्ष्याचे पिसे; दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांमध्ये संताप

पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; तातडीने तपासणी व स्वच्छतेची नागरिकांची मागणी

येन्सा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर : येन्सा गावातील शासकीय पाणीपुरवठ्यातून नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. पाणी भरत असताना पाण्यामध्ये पक्ष्याचे पिसे आढळून आल्याचा दावा नागरिकांनी केला असून, पाण्याला दुर्गंधी येत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या घटनेचा फोटोही समोर आला असून, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील अनेक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी शासकीय पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. मात्र, पाण्यामध्ये अशाप्रकारे अस्वच्छ घटक आढळून येत असल्याने पाण्याच्या शुद्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित स्वच्छता, देखभाल आणि पाण्याची गुणवत्ता तपासणी योग्य प्रकारे केली जाते का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

       येन्सा येथील पाण्याच्या टाकी वरील झाकण. 

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याने संबंधित शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व ग्रामसेवक यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे. पाणीपुरवठा योजनेची सखोल तपासणी करून जलस्रोत, पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था स्वच्छ करण्यात यावी, तसेच पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

दूषित पाण्यामुळे अतिसार, टायफॉइडसह विविध जलजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही आरोग्यविषयक समस्या उद्भवण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून येन्सा गावातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांची प्रमुख मागणी : शासकीय पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करून पाणीटाकी व वितरण यंत्रणेची स्वच्छता करावी आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.



Comments