लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात घरफोडी; सेवानिवृत्त वनमजुराच्या घरातून तब्बल ९७ हजार ९५५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास.

वरोऱ्यात घरफोडी; सेवानिवृत्त वनमजुराच्या घरातून तब्बल ९७ हजार ९५५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास.

वरोरा : प्रतिनिधी

वरोरा शहरातील कर्मवीर वॉर्ड परिसरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी गोदरेज आलमारी फोडून तब्बल ९७ हजार ९५५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भदु कवडुजी पिदुरकर (वय ६९), रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा हे सेवानिवृत्त वनमजूर असून ते आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा विक्रम हा पुणे येथे खासगी नोकरीस असून पत्नी व मुलासह तेथेच राहतो.

दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भदु पिदुरकर व त्यांची पत्नी शांताबाई हे मुलगा व नातवाला भेटण्यासाठी पुणे येथे रवाना झाले होते. घरातून जाण्यापूर्वी त्यांनी घरातील दोन्ही गोदरेज लोखंडी आलमारी व्यवस्थित लॉक करून घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते. त्यानंतर ते पुणे येथील वडगाव बु. येथे मुलगा विक्रम यांच्या घरी मुक्कामी होते.

दरम्यान, दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पिदुरकर यांच्या सुनेने घराच्या कंपाऊंड गेटजवळ येऊन पाहिले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे तिच्या निदर्शनास आले. शेजाऱ्यांना बोलावून घरात पाहणी केली असता बेडरूममधील गोदरेज आलमारी उघडी असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबत भदु पिदुरकर यांना फोनवरून माहिती दिली.

पिदुरकर यांनी तत्काळ आपला भाऊ दीपक पिदुरकर यांना घटनेची माहिती देऊन पोलीस ठाण्यात कळविण्यास सांगितले. त्यानंतर दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भदु पिदुरकर हे पत्नी, मुलगा व सुनेसह पुण्याहून वरोरा येथे घरी परतले.

घरात पाहणी केली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. तसेच बेडरूममधील लोखंडी गोदरेज आलमारीचे दार तोडून बाहेर निघालेले होते. लॉकर उघडे असून कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. आलमारीतील दागिन्यांच्या डब्या व पर्सही उघड्या अवस्थेत आढळून आल्या.

चोरट्याने घरातून ५.०२० ग्रॅम वजनाची मोतीचूर अंगठी किंमत १४ हजार २०५ रुपये, पोत पदक व मणी वजन १३.११० ग्रॅम किंमत ६५ हजार १२० रुपये, सोन्याचे मणी वजन ०.९९ ग्रॅम किंमत ५ हजार ३०० रुपये, सोन्याची अंगठी वजन १.१६ ग्रॅम किंमत १२ हजार १३० रुपये तसेच ९.९३० ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट किंमत १ हजार २०० रुपये, असा एकूण ९७ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही चोरी दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी भदु कवडुजी पिदुरकर यांच्या तोंडी तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments