लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

राजुरात गोळीबाराने खळबळ; पापा जाधव यांच्यावर गोळीबार.

राजुरात गोळीबाराने खळबळ; पापा जाधव यांच्यावर गोळीबार.
राजुरा | दि. २४ ऑगस्ट २०२६

राजुरा शहरात सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास तालुका न्यायालयासमोरील नारळपाणी विक्रीच्या दुकानाजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. विनोद उर्फ पापा जाधव यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळीबार केला. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पापा जाधव हे नारळपाणी विक्रीच्या दुकानाजवळ बसले असताना मोटारसायकलवरून दोन तरुण तेथे आले. त्यापैकी एका तरुणाने जाधव यांच्या दिशेने अचानक गोळीबार केला. हल्ल्यानंतर दोन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी जखमी पापा जाधव यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय परिसरातही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
पापा जाधव हे सोमनाथपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, तसेच हल्लेखोर कोण आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी राजुरा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
राजुरात गोळीबाराच्या घटनांची मालिका?
राजुरा शहरात यापूर्वीही गोळीबाराच्या गंभीर घटना घडल्या असून, अशा घटनांमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भरवस्तीत, न्यायालयाच्या परिसरासमोरच गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments