लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोड्यात मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०१ रुग्णांची तपासणी.

वरोड्यात मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०१ रुग्णांची तपासणी

लता मंगेशकर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन; न्यूरोलॉजी व नेफ्रोलॉजी विभागाचा सहभाग

वरोरा, दि. २८ ऑगस्ट २०२६ :/ ठेंगडीसर
एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्रांतर्गत नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने वरोडा शहरात मोफत सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर वझे यांच्या सुयोग हॉस्पिटलमध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात न्यूरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. या शिबिरात न्यूरोलॉजी विभागातील ८०, तर नेफ्रोलॉजी विभागातील २१, अशा एकूण १०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

न्यूरोलॉजी विभागात पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी, कानात आवाज येणे, हात-पायात मुंग्या येणे, पक्षाघात, हात-पायात कमजोरी येणे, ब्रेन ट्यूमर, स्पायनल ट्यूमर तसेच मानेचा व कंबरेचा स्पॉन्डिलायसिस आदी तक्रारींबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.

नेफ्रोलॉजी विभागात मूत्रपिंडाशी संबंधित आजार, पाय, घोटे, चेहरा किंवा डोळ्यांच्या आसपास सूज येणे, लघवीमध्ये रक्त येणे, कंबर किंवा किडनीच्या भागात दुखणे, रक्तदाब वाढणे, सतत थकवा व अशक्तपणा जाणवणे, भूक कमी लागणे, मळमळ किंवा उलटी होणे आदी लक्षणांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरासाठी लता मंगेशकर हॉस्पिटलचे न्यूरोलॉजी तज्ज्ञ डॉ. स्वप्नेश चिंधालोरे तसेच नेफ्रोलॉजी विभागाचे तज्ज्ञ डॉ. मोहित कुरुंदवाडकर यांचे सहकार्य लाभले.

ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे तसेच गंभीर आजारांची लक्षणे वेळेत ओळखून योग्य उपचाराचा मार्ग मिळावा, हा या शिबिरामागील उद्देश होता.

शिबिराला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता गरीब व गरजू नागरिकांपर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी यापुढेही दरमहा अशाच प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.


Comments