रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टकडून माढेळी येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण; चार अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
'स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना' अंतर्गत उपक्रम; "मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो" – सुषमाताई शिंदे
माढेळी (वरोरा) | प्रतिनिधी :
समाजातील गरजू, वंचित व निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने माढेळी येथे प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. 'स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना' अंतर्गत किसान विद्यालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. तसेच यापूर्वी दत्तक योजनेत समाविष्ट असलेल्या २१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे आणि ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाला ट्रस्टच्या कोषाध्यक्षा सुषमाताई शिंदे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जयंत टेमुर्डे, डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक भीमराव वाटकर, सामाजिक कार्यकर्ते तात्याजी चौधरी, ज्ञानेश्वर ढोके, निखील हिवरकर, लक्ष्मण ठेंगणे, मारोतराव गारघाटे, कवडू तानले, किसान विद्यालयाचे प्राचार्य कावटी सर तसेच बेंडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सुषमाताई शिंदे म्हणाल्या, "मराठी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मला अभिमान वाटतो. माझा रवीही मराठी शाळेतूनच शिक्षण घेतलेला आहे. ट्रस्ट ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहे, त्याचप्रमाणे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनीही समाजाप्रती आपले योगदान द्यावे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे."
या उपक्रमांतर्गत अश्लेषा जांबुवंत वैद्य (इयत्ता १० वी), श्रावणी किशोर पावडे (इयत्ता १० वी), सुहानी किशोर पावडे (इयत्ता ६ वी) आणि सोहम प्रकाश टिपले (इयत्ता ९ वी) या चार अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व ट्रस्टने अधिकृतपणे स्वीकारले असून त्यांच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. याशिवाय, दत्तक योजनेत आधीपासून समाविष्ट असलेल्या किसान विद्यालयातील २१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भोयर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टच्या जयश्री फाले तसेच विद्यालयातील बरडे मॅडम, नैताम मॅडम, दारुंदे मॅडम आणि माथनकर सर यांनी विशेष सहकार्य केले.
लाभार्थी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झालेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत असून ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment