लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान, वरोरा येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य नामसप्ताह सोहळ्याचे आयोजन

श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान, वरोरा येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य नामसप्ताह सोहळ्याचे आयोजन

वरोरा : श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान, वरोरा यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शनिवार, दि. 18 जुलै 2026 ते रविवार, दि. 26 जुलै 2026 या कालावधीत भव्य नामसप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

सोहळ्याची सुरुवात शनिवार, दि. 18 जुलै रोजी पहाटे 5.00 वाजता घटस्थापना व सकाळी 7.00 वाजता ध्वजारोहणाने होणार आहे. त्यानंतर 18 ते 25 जुलै दरम्यान दररोज सकाळी 6.00 वाजता श्रींची महापूजा तसेच सकाळी 9.30 व संध्याकाळी 6.30 वाजता भजन व महाआरती आयोजित करण्यात आली आहे.

या सप्ताहात भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. तसेच श्री गणेश अथर्वशीर्ष सामूहिक पठण, पालखी हरिपाठ, भक्ती संगीत कार्यक्रम यांचेही आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी जपत बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत मोफत नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. निखिल अ. लांबट (नेत्ररोग तज्ज्ञ) व डॉ. स्नेहदीप रामटेके (दंतचिकित्सक) सेवा देणार आहेत.

रविवार, दि. 26 जुलै 2026 रोजी आषाढी द्वादशी निमित्त गोपाळकाल्याचे कीर्तन, श्रींच्या प्राणप्रिय रथ व माऊली-जगद्गुरूंची पालखी भजनी दिंडीसह भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.

याशिवाय शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान, वरोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा; मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा!” अशी भक्तिमय हाक देत या संपूर्ण सोहळ्यात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे देवस्थानने आवाहन केले आहे. 
....

Comments