लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वनी बायपासवरील खड्ड्यांविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन; वाहतूक ठप्प, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर खड्डे बुजविण्यास सुरुवात.वरोरा डीपी पथकाने त्वरित प्रश्न मार्गी लावला.

वनी बायपासवरील खड्ड्यांविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन; 

वाहतूक ठप्प, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर खड्डे बुजविण्यास सुरुवात.

वरोरा डीपी पथकाने त्वरित प्रश्न मार्गी लावला.

वरोरा/चेतन लूतडे/14/7/2026
वरोरा शहरातील वनी बायपास मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मंगळवारी दुपारी तीव्र आंदोलन छेडले. मनसेचे पदाधिकारी आनंद गेडाम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
मंगळवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास मनसेचे नेते आनंद गेडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी वनी बायपासवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन सुरू केले. "जोपर्यंत संबंधित अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही," अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे वनीकडून वरोऱ्याकडे ये-जा करणारी वाहतूक काही काळासाठी बंद पडली.
आंदोलकांनी सांगितले की, या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार व वाहनचालक अपघातग्रस्त झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे मनसेला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली.

घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाचे  शरद भस्मे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आंदोलकांची बाजू समजून घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता लोहे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. मात्र, संबंधित मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने या रस्त्याच्या मालकीबाबत संभ्रम अधिकच वाढला.
वरोरा ते गणपती मंदिर मार्गे वनी महामार्गाला जोडणाऱ्या सुमारे दोन किलोमीटरच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डीबी पथकाचे शरद भस्मे यांनी तातडीने जेसीबी बोलावून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करून घेतले. त्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेत पोलिसांचे आभार मानले.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही विभागांनी हा रस्ता त्यांच्या अखत्यारीत नसल्याचे सांगितल्याने नेमका हा मार्ग कोणत्या विभागाच्या ताब्यात आहे आणि त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती कोण करणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.
.................

Comments