गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र’ सुरू
स्पोकन इंग्लिश, योग प्रशिक्षणासह सर्वांगीण विकासावर भर; उद्घाटन बाबासाहेब भागडे यांच्या हस्ते
वरोरा प्रतिनिधी :
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने ‘लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, १ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता जेतवन बुद्ध विहार, कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या अभ्यास केंद्राचे नियमित कामकाज कल्याणेश्वर हनुमान मंदिर परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात सुरू राहणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारोतराव घुमे होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना बाबासाहेब भागडे म्हणाले, "शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि स्पर्धात्मकता विकसित होते. लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र भविष्यात अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणारे प्रेरणास्थान ठरेल."
अध्यक्षीय भाषणात मारोतराव घुमे यांनी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थी विकासासाठी सातत्याने उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
संस्थेचे सचिव आशिष घुमे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील प्रेरणा स्पष्ट करताना सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीचा लाभ घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण, दर्जेदार मार्गदर्शन आणि आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने या अभ्यास केंद्राची संकल्पना साकारण्यात आली. उद्घाटनाच्या दिवशीच ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात विशेष सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रेखा तेलतुमडे, सार्वजनिक बांधकाम सभापती मनीष जेठानी, नगरसेविका मनीषा संजय दानव, डॉ. अंकुश आगलावे, डॉ. सागर वझे, सामाजिक कार्यकर्ते अमित चवले, ‘गो विथ स्ट्रक्चर’ उपक्रमाचे प्रणेते गोपाळ गुढधे, शेख जैरुद्दीन (छोटूभाई), योग शिक्षिका सरिता मिटकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, त्यांचे पालक आणि कॉलरी वॉर्ड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक टिपले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव आशिष घुमे, उपाध्यक्ष संजय दानव, सहसचिव रमेश वटकर, कार्यकारिणी सदस्य सूरज घुमे, राहुल भोयर, ॲड. अरुणा जांभुळकर, कोमल फरकाडे, हर्षल दानव, तसेच कल्याणेश्वर हनुमान मंदिराचे सुनील इंगळे, सागर आत्राम, चेतन बुरडकर, नूतन बुरडकर, सार्थक नागपुरे, प्रशांत साळवे, अजय बावणे, छाया चव्हाण, ज्योती किटे आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा कांता उमरे यांनी अथक परिश्रम घेतले.
चौकट : स्पोकन इंग्लिश व योग प्रशिक्षणालाही प्रारंभ
लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २ जुलैपासून नियमित स्पोकन इंग्लिश वर्ग सुरू होत आहेत. ‘गो विथ स्ट्रक्चर’ उपक्रमाचे प्रणेते गोपाळ गुढधे विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देणार असून, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रभावी संवादकौशल्य वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
याशिवाय योग शिक्षिका सरिता मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित योगाभ्यासाचे वर्गही आयोजित करण्यात येणार आहेत. सामूहिक अभ्यास, योग, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, वाचन संस्कृती आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यास केंद्र नवी आशा आणि नवी दिशा ठरणार आहे.
Comments
Post a Comment