चंद्रपूर MLC रणधुमाळी; ‘ऑपरेशन नगरसेवक’ने काँग्रेस हादरली, 5+5 लाखांच्या फॉर्म्युल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा
सिंदेवाही, नागभीड आणि सावलीतील नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; पर्यटन सहलीच्या नावाखाली राजकीय डावपेच?
बातमी
Chandrapur : चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद (MLC) निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या मतदारांची जुळवाजुळव सुरू केली असताना काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील काही काँग्रेस नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सिंदेवाहीतील नगराध्यक्षांसह पाच, नागभीडमधील सहा आणि सावलीमधील पाच नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेले आहेत. संबंधित नगरसेवकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची ऑफर देत ‘पर्यटन सहली’च्या नावाखाली अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
“5+5 लाख” फॉर्म्युल्याची चर्चा
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत यंदा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त असल्याने केवळ नगरपरिषद व नगरपंचायतींचे नगरसेवकच मतदार राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी गटांकडून नगरसेवकांशी थेट संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
राजकीय सूत्रांनुसार, “गाडीत बसताना 5 लाख आणि मतदानानंतर आणखी 5 लाख” असा कथित फॉर्म्युला आखण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात रोख रक्कम देण्यात आल्याची चर्चा असून उर्वरित रक्कम मतदानाच्या दिवशी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळी सहलीच्या नावाखाली नगरसेवकांना बाहेर पाठवून त्यांना राजकीय संरक्षण दिल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.
काँग्रेसमध्ये खळबळ, भाजपाची शांत भूमिका
नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्याची माहिती समोर येताच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली सुरू केल्या. संबंधित नगरसेवकांचे मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती मिळत आहे. काही कुटुंबीयांनाही नगरसेवकांचे नेमके ठिकाण माहीत नसल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.
दुसरीकडे भाजपाने या कथित “10 लाख पॅकेज” प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देणे टाळले असून सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. मतदानाला अजून काही दिवस बाकी असतानाच सुरू झालेल्या या कथित ‘ऑपरेशन नगरसेवक’मुळे विधान परिषद निवडणूक रंगतदार बनली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका स्थिती
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अनेक नगरपरिषद व नगरपंचायती अस्तित्वात असून स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत याच नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
महत्त्वाच्या नगरपालिका / नगरपंचायती:
Warora नगर परिषद
Ballarpur नगर परिषद
Rajura नगर परिषद
Mul नगर परिषद
Brahmapuri नगर परिषद
Nagbhid नगर परिषद
Sindewahi नगर पंचायत
Sawali नगर पंचायत
Chimur नगर परिषद
यातील अनेक ठिकाणी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांचे नगरसेवक निर्णायक संख्येत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतासाठी राजकीय ‘रणनीती’ आखली जात असल्याचे चित्र आहे.
Comments
Post a Comment