लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

​भाजपचे 'नारी शक्ती'चे प्रेम म्हणजे केवळ निवडणुकीचा इव्हेंट :- खासदार प्रतिभा धानोरकर*

*​भाजपचे 'नारी शक्ती'चे प्रेम म्हणजे केवळ निवडणुकीचा इव्हेंट :- खासदार प्रतिभा धानोरकर*

​चंद्रपूर: "भारतीय जनता पक्ष महिला आरक्षणाचा केवळ आभासी प्रचार करून महिलांची दिशाभूल करत आहे. प्रत्यक्षात, त्यांनी या आरक्षणाला जनगणना आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या जाचक अटींमध्ये अडकवून महिलांच्या हक्कांची पायमल्ली केली आहे. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये संसदेत जेव्हा हे विधेयक मांडण्यात आले, तेव्हा काँग्रेसने महिलांच्या हिताचा विचार करून या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपचा खरा हेतू महिलांना अधिकार देणे नसून हे आरक्षण अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवणे हाच आहे," अशा परखड शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

​खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका करताना स्पष्ट केले की, केंद्र सरकारने जाणीवपूर्वक जनगणनेची प्रक्रिया प्रलंबित ठेवली आहे. जोपर्यंत जनगणना होत नाही आणि मतदारसंघांची पुनर्रचना पूर्ण होत नाही, तोपर्यंत महिलांना आरक्षण मिळणार नाही, अशी अट घालणे म्हणजे देशातील स्त्रीशक्तीची क्रूर थट्टा आहे. आमची ठाम मागणी आहे की, हे आरक्षण २०२९ च्या प्रतीक्षेत न ठेवता, कोणतीही तांत्रिक अट न लादता 'तत्काळ' लागू करावे. भाजपला खरोखरच महिलांना न्याय द्यायचा असेल, तर त्यांनी जनगणनेच्या नावाखाली चालवलेला हा राजकीय वेळकाढूपणा त्वरित थांबवावा.
​देशाची जनगणना लांबणीवर टाकणे हा ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर केलेला जाणीवपूर्वक आघात असल्याचा आरोपही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला.

 जनगणना ही केवळ संख्यात्मक माहिती गोळा करण्यासाठी नसते, तर त्या आधारे समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना सत्तेत व विकासात न्याय्य वाटा मिळतो. जोपर्यंत पारदर्शक जनगणना होत नाही, तोपर्यंत ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणे दुरापास्त आहे. केवळ स्वतःच्या राजकीय लाभासाठी पुनर्रचनेचा घाट घालण्यापेक्षा, सरकारने जनगणनेची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

​खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 'जातनिहाय जनगणनेच्या' मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरताना म्हटले की, ओबीसी, एससी आणि एसटी समाजाच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार पूर्णपणे असंवेदनशील आहे. विशेषतः महिला आरक्षणामध्ये ओबीसी महिलांना स्वतंत्र आरक्षण  मिळाल्याशिवाय हा कायदा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरणार नाही. या तरतुदीशिवाय ओबीसी भगिनी सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतील. जोपर्यंत ओबीसी महिलांना त्यांचा हक्काचा वाटा मिळत नाही आणि जातनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा सनदशीर लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
.......

Comments