वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरातील लोकशिक्षण संस्थेत दोन दिवसीय वाचक संमेलन व ग्रंथ मेळाव्याचे आयोजन

वरोरातील लोकशिक्षण संस्थेत दोन दिवसीय वाचक संमेलन व ग्रंथ मेळाव्याचे आयोजन

वरोरा : लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'असे वाचक घडलो आम्ही' या उपक्रमाची वाटचाल पुढे नेत संस्थेच्या परिसरात दोन दिवसीय वाचक संमेलन आणि ग्रंथ मेळाव्याचे आयोजन २१ व २२ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. वाचन संस्कृतीच्या विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी २१ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित राहणार आहेत. कविवर्य इंद्रजीत भालेराव (परभणी) प्रमुख अतिथी म्हणून तर प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री स्वागताध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विजय प्रकाशन, लाखे प्रकाशन आणि पिंपळापुरे प्रकाशनाचे प्रतिनिधी यावेळी मनोगत व्यक्त करतील.

सायंकाळी ५ वाजता वाचन चळवळ उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त भीमाबाई जोंधळे (आजीचे पुस्तकांचे हॉटेल, नाशिक), अक्षर आनंद उपक्रमाचे विनोद शेंडगे (परभणी) आणि 'रीडिंग किडा' या बालवाचक घडविणाऱ्या उपक्रमाच्या प्रणेत्या डॉ. पल्लवी बापट (नागपूर) यांच्या मुलाखती होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता प्रा. श्रीकांत पाटील 'आवडलेल्या कथा कथाकारांच्या शब्दात' हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता 'वाचकाने लिहिते होताना' या सत्रात डॉ. माधुरी मानवटकर व प्रसिद्ध नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी आपला लेखन प्रवास कथन करतील. सकाळी १०.३० वाजता 'मैफल कवितांची' या कार्यक्रमात इंद्रजीत भालेराव आपल्या कवितांची मेजवानी सादर करतील.

या संमेलनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशकांची पुस्तक विक्री केंद्रे उपलब्ध राहणार असून वाचक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांनी केले. पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ऍड. दुष्यंत देशपांडे, प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री, प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय अंबुलकर, स्मिता धोपटे आदी उपस्थित होते.

Comments