वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

तालुका स्तरावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण

*तालुका स्तरावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण*

चंद्रपूर, दि. 13 जून : आपत्तीच्या काळात तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने तसेच मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने चिमूर व नागभीड तालुक्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने विशेष आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षण घेण्यात आले.  

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यात प्राथमिक बचाव व शोध मोहीम, प्राथमिक उपचार व सीपीआर, पूर्वसूचना प्रणाली व समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय व बचाव कार्य, आपत्कालीन उपकरणांचा वापर व सुरक्षाविधी यांचा समावेश होता.

या प्रशिक्षणामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण, कृषी, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. चिमूर व नागभीड तालुक्यात  राज्य आपत्ती प्रतिसाद दल ,नागपुरचे  पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ भंडारे यांच्या नेतृत्वात 9 रेस्क्यूवर प्रशिक्षण देण्यात आले. चिमूर तहसील कार्यालयामध्ये इम्प्रोवाईज डिवाइस, स्टॅंडर्ड डिवाइस, एम. एफ. आर. मध्ये सीपीआर व विविध प्रकारचे बँडेज कशा प्रकारे बांधतात, अशा बाबींवर आपत्ती व्यवस्थापन विषयक  माहिती  देण्यात  आली. तसेच चिमूर आणि नागभीड तहसील मधील उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी करण्यात आली .

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणातील माहिती आपापल्या तालुक्यातील इतरांना देण्यासाठी अतिशय गांभीर्याने प्रशिक्षण शिकून घ्या.  पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले.

चिमूर येथे पार पडलेल्या प्रशिक्षणावेळी  अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे,  उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे  यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीधर राजमाने, नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, तसेच नागभीड येथे तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, तालुका कृषी अधिकारी श्री. पुजारी, नायब तहसीलदार उमेश कावळे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

*अधिक प्रशिक्षण सत्रे व मॉकड्रील घेण्याचे नियोजन :* या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील यंत्रणांना आपत्ती काळात योग्य ती तयारी ठेवता येणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. आगामी काळात अधिक प्रशिक्षण सत्रे व प्रत्यक्ष मॉकड्रिल्स घेण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी दिली.

००००००

Comments