संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबी एसई च्या तायक्वांदो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन
वरोरा : संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने दिनांक 21 ते 24 जूनला तायक्वांदो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धांमुळे वरोरा शहराला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे.
शाळेच्या प्राचार्या राणी पटेल यांनी माहिती देताना सांगितले की, शाळेत होणाऱ्या तायक्वांदो झोनल स्पर्धेत बंगळुरू, पुणे आणि तिरुवनंतपुरम विभागातील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. वरोरा परिसरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे.
तायक्वांदो स्पर्धेनंतर लगेचच सीबीएसईच्या क्लस्टर-९ स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांतील विद्यार्थी सहभागी होणार असून, या स्पर्धा केवळ मुलांच्या गटासाठी असतील.
या दोन्ही स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी नागरिक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्या राणी पटेल यांनी केले आहे .
या स्पर्धांमुळे वरोरा शहरात क्रीडा क्षेत्राला चालना मिळण्यासोबतच देशभरातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचे लक्ष वेधले जाणार आहे.
Comments
Post a Comment