वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

बाबांचे जीवाभावाचे कार्यकर्ते हेच आनंदवनचा पाया: डॉक्टर प्रकाश आमटे**सामान्य कार्यकर्त्यांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता**आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या सेवेला 75 वर्षे पूर्ण*

*बाबांचे जीवाभावाचे कार्यकर्ते हेच आनंदवनचा पाया: डॉक्टर प्रकाश आमटे*

*सामान्य कार्यकर्त्यांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता*

*आनंदवनातील कुष्ठरोग्यांच्या सेवेला 75 वर्षे पूर्ण*

 

वरोडा : शाम ठेंगडी 
     
        कुष्ठ रुग्णांच्या सेवेचे व्रत सुरू करताना बाबांनी कोणतीही जात-पात, धर्म, पंथ न मानता केवळ मानवता हाच धर्म मानून हे कार्य सुरू केले.त्यांनी कुष्ठरोग्यांसोबत ज्यांच्या जीवनात दुःख होतं त्यांची हेटाळणी न करता त्यांची निस्वार्थ सेवा केली. बाबांनी माणूस घडविण्याचे काम करत  जिवाभावाचे कार्यकर्ते निर्माण केले. या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरच आनंदवन उभे राहिले आहे. आम्ही  निमित्तमात्र आहोत. कोणत्याही संस्थेचा पाया मजबूत असेल तर संस्था टिकते. बाबांनी निर्माण केलेले जिवाभावाचे कार्यकर्ते हाच आनंदवनचा पाया आहे. अशा कार्यकर्त्यांच्या भरोशावरच महायोगी सेवा समिती भक्कमपणे उभी असून भविष्यातही कार्यरत राहील असा विश्वास महारोगी सेवा समितीचे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आज श्रद्धावनात आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केला.
     समाजासोबत स्वकीयांनी बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोगांच्या सेवेला आज 21 जून 2026 ला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
         महारोगी सेवा समितीची स्थापना करून आनंदवनात कुष्ठरोग्यांच्या सेवेला सुरुवात केल्यानंतर भूदान चळवळीचे प्रणेते विनोबाजी भावे यांनी २१ जून १९५१ ला आनंदवनला भेट देऊन कुष्ठरोगांच्या सेवेची विधिवत सुरुवात झाल्याची घोषणा एका छोट्याखानी कार्यक्रमात केली होती. यावेळी बोलताना विनोबा भावे यांनी आनंदवनात सेवेचे रामायण घडेल असा विश्वास व्यक्त केला होता. जो आज सार्थ होत असल्याचे दिसत आहे. यावेळी विनोबा भावे सोबत असलेले गौतम भाई बजाज हे  कार्यक्रमाला उपस्थित होते.
        
     श्रद्धावनात आज २१ जून रोज रविवारला  सकाळी  महारोगी सेवा समितीचे सचिव डॉक्टर विकास आमटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पवनार आश्रमाचे कार्यवाहक गौतम भाई बजाज, डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यासोबतच आनंदवनच्या डॉ. भारती आमटे प्रमुख  अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
            यावेळी स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलाकारांनी विनोबा भावे यांचे "ओम तत श्री नारायण तू...." व साने गुरुजींचे "खरा तो एकची धर्म..." ही दोन गीते सादर केली.
        कार्यकर्त्यांना कळत नकळत आमच्यावर संस्कार झाले या संस्काराची संस्थाराच्या शेजारीवरच समितीचे कार्य सुरू असून आमटे परिवाराची तिसरी पिढी आत्मप्रेरणेने सेवा करीत करीत असून हे कार्य असेच सुरू राहील अशी ग्वाहीही प्रकाश आमटे यांनी यावेळी दिली. 

*समूहाची शक्ती महत्त्वाची: बजाज*
            बाबांची कल्पनाशक्ती आकाशाला गवसणी घालणारी होती.बाबांना कुष्ठरोग्याचे दर्शन झाले.यातूनच प्रेरणा घेत त्यांनी कुष्ठरोग यांच्या सेवेचे व्रत घेतले. बाबांच्या कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या साधनाताईंचे महत्त्व नाकारता येत नाही. मोठ्यांचे नाव दिसते पण त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी, संस्था उभी करणारे सामान्य कार्यकर्ते यांना विसरता येणार नाही. समूहाची शक्ती असल्याशिवाय कोणतेही काम होत नाही असे मत पवनार आश्रमचे कार्यवाहक गौतमभाई बजाज यांनी यावेळी व्यक्त केले.
        या कार्यक्रमात प्रा. मोक्षदा मनोहर- नाईक  यांनी "संचिताचे कवडसे - इथे सेवेचे रामायण लिहिले जाईल "  तर प्राध्यापक तानाजी बायस्कर यांनी " फादर डेमियन " व डॉक्टर पल्लवी ताजने यांनी "हॅप्पी फॉरेस्ट"या लेखाचे वाचन केले.
          कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन,  बाबा व साधनाताई तसेच विनोबा भावे यांच्या प्रतिमेला मालार्पण करून झाली. यावेळी स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या अंध व अपंग कलाकारांनी "मुक्तांगणात या रे, सर्व मिळून या रे...." हे गीत सादर केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते अनाम वृक्षाची व अनाम मूक कळ्यांच्या स्मरणशीलेला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर श्रद्धावनापर्यंत बालतरूची दिंडी ही काढण्यात आली. श्रद्धावनात ही दिंडी पोहोचताच मान्यवरांच्या हस्ते तिथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी "आनंद साधकांनो यारे, मिळून सारे, आनंदवनात यारे" हे गीत सादर झाले.
        महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आनंदवनचा इतिहास व कार्यक्रमाचे औचित्य कथन केले. रवींद्र नलगंटीवार यांनी कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मानले. "शृंखला पायी असू दे,मी गतीचे गीत गायी....." या बाबांच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments